Monday, March 23, 2026

मोबाईल कलाकारांना अडथळा बनत आहे..!

  


अनेक दिवस एक गोष्ट बोलेन म्हणते. आज बोलते.. 

संवेदनशील मनाने समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर बरं वाटेल. 

कलाकारांचा आणि श्रोत्यांचा ध्यानभंग करणारी एक गोष्ट आज सर्वांच्या हातात आहे, ती म्हणजे मोबाईल. फोटो काढणे, क्लिप्स बनवणे, रेकॉर्डिंग करणे… या सगळ्यामुळे कलाकाराला रागाच्या भावावस्थेत शिरताना मोठा अडथळा निर्माण होतो. इतकं सोपं असतं का रागगायन करणं? एखादा राग खुलवण्यासाठी जे पोषक, एकाग्र वातावरण आवश्यक असतं, ते आम्हाला अनेकदा समोरून मिळत नाही हो. 

अनेकदा प्रसिद्धी पेक्षा महत्वाचं असतं समाधान. राग उत्तम रंगला, शांत चित्ताने मांडता आला की होतं- ते समाधान. 

आमच्या गाण्याचे तीस सेकंदांचे, एक मिनिटाचे रील्स बनवून इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करणे, ही आमची अपेक्षा नाही. त्यापेक्षा तुम्ही शांत बसून, पूर्ण लक्ष देऊन गाणं ऐकलंत, तर ते आमच्यासाठी अधिक समाधानकारक आहे. कारण अशा कृतीतून ना कलाकाराला खरी समाधानाची अनुभूती मिळते, ना श्रोत्याला. मान्य आहे तुमच्या व्हिडिओ शूट करण्यामागे प्रेम आहे. त्याची नोंद आणि कृतज्ञ भाव आम्हा कलाकारांच्या मनात असतो. पण ती कृती आमच्या बांधणीत बाधा आणते हो. 

म्हणूनच एक प्रश्न पडतो, ..प्रेक्षागृहात मोबाईल निषिद्ध का नसावा? असा नियम का नसावा? आपण पाहिलं आहे की काही देवस्थानांमध्ये मोबाईल वापरण्यावर पूर्ण निर्बंध असतात. मग इथे का नको. 

परवा आस्ताद चा व्हिडिओ पाहिला. त्या पाठीमागची कलाकाराची तळमळ समजून घ्या. परफॉर्मिंग आर्ट.. म्हणजे मंचावरचा प्रत्येक क्षण पूर्ण अनुभूतीने जगणं. तिथे पूर्वनियोजित काहीही नसतं. त्या क्षणाला जी उपज येते तीच कलाकृती.. रागाचं भावविश्व गवसणं इतकं सोपं असतं का? राग मूर्त स्वरूपात उभा करत असताना जे पोषक वातावरण हवं आहे ते अनेकदा आम्हाला मिळत नाही.. 

आणि हे मान्य आहे की आजच्या काळात प्रसिद्धी महत्त्वाची आहे. गाण्याचं सोशल मीडियावर असलेलं अस्तित्व……रील्स, व्हिडिओज, यूट्यूबवरचे फुल-लेंथ व्हिडिओज, हे सगळं आवश्यकच आहे. पण त्यासाठी प्रत्येकाने हातात मोबाईल घेऊन शूट करणं अजिबात गरजेचं नाही. त्या कामाकरता नेमलेल्या दोन- तीन व्यक्ती उत्तम दर्जाचे फुल-लेंग्थ व्हिडिओ किंवा शॉर्ट रील्स तयार करू शकतात. फोटोज काढू शकतात. ते पुरेसं आहे. पण जर संपूर्ण प्रेक्षागृहात सतत स्क्रीनचं चकाकणं सुरू असेल, तर तो इतका मोठा ध्यानभंग होतो की कलाकाराने मग नेमकं गायचं कसं. राग नीट रंगला नाही तर त्या बिचाऱ्या कलाकारावर टीका ही होतेच. एक शांत स्वच्छ कॅनव्हास हवा आहे, तर चित्र देखणं सुबक चितारता येईल. इतकी माफक अपेक्षा गैर आहे का?


प्रेक्षागृहात मोबाईल वापरण्यावर बंदी हवी असे माझे मत आहे. यामुळे किमान तीन तास मोबाईलशिवाय राहण्याची एक साधना तरी घडेल. गाणं नेमकं कसं ऐकायचं, त्यातलं सूक्ष्म काय आहे, हे जाणून घेण्याची सवय लागेल. सतत स्क्रीनकडे पाहत राहून आपण खरंच राग ऐकतो आहोत का? की फक्त काहीतरी पार्श्वभूमीला चालू आहे? चित्तवृत्ती एका ठिकाणी पूर्णपणे स्थिर होणं, हेच खरं श्रवणाचं तत्त्व आहे. श्रोत्याचं आणि कलाकाराचं मन एकरूप होणं आवश्यक आहे. आणि त्या अवकाशात मोबाईल हा फार मोठा अडथळा ठरतो आहे.

हा अडथळा आपण कधी दूर करणार?”

आणि हा अडथळा ज्या क्षणी दूर होईल, त्या क्षणी मी पैज लावून सांगते.. असे श्रोते घडतील की एक तास काय, दीड तास काय, पूर्ण तीन तासांची मैफल अत्यंत एकाग्रतेने आणि सुरेखपणे ऐकतील. तसेच, त्या उंचीचे कलाकारही अधिक खुलून येतील, आणि तितक्याच जाणिवेने ऐकणारे श्रोते तयार होतील, याबद्दल मी अत्यंत ठाम आहे.

आजही आपण आपल्या ज्येष्ठांकडून ऐकतो ‘काय रंगली होती ती मैफल!’ आणि ते सांगताना त्यांच्या अंगावर शहारे येतात. स्वरागणिक आठवणी त्यांच्या मनात जिवंत असतात. जुन्या पिढीचं कशाला.. मी स्वतः सांगू शकते की लहानपणी अनुभवलेल्या बहुतेक मैफिली आजही जशाच्या तशा माझ्या स्मरणात आहेत. केवळ नोंदी म्हणून नाही, तर त्या वेळी अनुभवलेल्या आनंदासकट, त्या भावावस्थेसकट


मला आठवतं मी लहान असताना उस्ताद विलायत खाँ साहेब 

यांची सतार ऐकण्याचा योग आला होता, सवाई गंधर्व चा मंच. हजारो श्रोते, एकच कलाकार….पण संपूर्ण मंडपात एकच मन. जणू कलाकाराने आपल्या मनात सर्वांना सामावून घेतलंय. जणू तो अवलिया सर्वाना एका प्रवासाला घेऊन निघालाय. सगळे एकाच नावेत, एकाच भावविश्वात, सगळे सहप्रवासी!! तो अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे, पण वातावरणात एक अद्भुत जादू होती.

काहींच्या डोळ्यात अश्रू होते, काही कृतज्ञतेने भरून गेले होते… प्रत्येकजण त्या रागरसात पूर्णपणे बुडून गेला होता. ती काय अवस्था होती, हे सांगणं कठीण आहे, पण ते अनुभवणं मात्र अमोल होतं.

आणि मग प्रश्न पडतो, आज असं का घडत नाही?

कलाकारांचा दर्जा खालावला आहे, असं अजिबात नाही. उलट, आजही अत्यंत समर्थ आणि प्रतिभावान कलाकार आहेत. पण त्यांना जो‘अवकाश’ आवश्यक आहे, जी शांतता आवश्यक आहे ती मिळत नाही. आणि हे आपण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे.


श्रुती विश्वकर्मा..मराठे..

ठाणे.. 

Saturday, February 8, 2025

आनंदवन..७५..विकासाची नवी दिशा

 






 शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही....

 

ह्या काव्यपंक्ती ज्यांनी रचल्या व प्रत्यक्षात तसे जगून दाखविले ते बाबा आमटे आणि गृहिणी-सखी-सचिव या तिन्ही भूमिका व्रतस्थपणे जगत त्यांना तहहयात साथ देणाऱ्या साधनाताई आमटे, या उभयतांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात महारोगी सेवा समिती, वरोरा या स्वयंसेवी संस्थेच्या रूपाने सुरू केलेल्या कार्ययज्ञास नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली!


या साडेसात दशकांच्या या लोकविलक्षण सेवाकार्याचे सिंहावलोकन आणि पुढील २५ वर्षांत योजित कार्याच्या दिशेची सुहृदांपुढे मांडणी या उद्देशाने “आनंदवन” इथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी“योगदानाचा–कृतज्ञतेचा–सद्भावनेचा–मित्रमेळावा” आयोजित केला आहे.

त्यानिमित्त आनंदवन विषयीचे हे टिपण..!

 


समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे आनंदवन..!


आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरीत झाला आहे.  आज आनंदवन ही स्वतंत्र ग्रामपंचायत उभी आहे. या प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते.

आज ही महारोगी यांची रचनात्मक घडण करणारी जगातील एकमेव संस्था.. ७५ वर्षे पूर्ण करून आपला आदर्श निर्माण करीत आहे.


शरीराचा कुष्ठरोग मी बरा केला..पण मनाचा कुष्ठरोग मी बरा करू शकलो नाही..

सुदृढ मनाला जडलेला कुष्ठरोग अजून बरा झालेला नाही.. ज्या दिवशी तो बरा होईल त्या दिवशी आनंदवन सारखी चालविण्याची गरज पडणार नाही..

बाबा आमटे..


इतर आजाराप्रमाणे तुम्ही कुष्ठरोगी बरा झालेला असेल तर तुम्ही त्याला सन्मानाने, वाजत गाजत घरी घेऊन जा.. आणि समाजाला सांगा हा बरा झाला..मी आणतो..तुमच्यात वाढवा..पण ते होत नाही.. ही स्थिती बदलण्याची गरज आहे..असे डॉ. विकास आमटे सांगतात.


आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद.


आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे.


हाथ लगे निर्माण मे 

नहीं मारणे

नहीं मांगने..

बाबा आमटे यांच्या सांगण्यानुसार

त्याला असे उभे करा की तो मागू नाही शकला पाहिजे कुणाकडे..

असे आनंदवन  कुष्ठरोग्यांनी उभे केले..


आनंदवन इथे कुष्ठरोगी यांच्या निरनिराळ्या सहा वसाहती आहेत..त्यांच्यासाठी या मेगा किचनमध्ये स्वयंपाक होतो..तोही हेच लोक..स्त्रिया करतात.

इथे महाविद्यालय..शाळा आहेत त्यानाही इथे भोजनासाठी व्यवस्था इथे  करण्यात आली आहे..

त्यासाठी इंधन म्हणून पुण्याच्या किर्लोस्कर  यांच्या तंत्रज्ञान घेऊन बायो गॅसची निर्मिती  केली.  सोलर पॅनल द्वारे वीज निर्मिती करून त्यातून इथे ऊर्जा आणली गेली.

प्रत्यक्ष कुष्ठरोग्यांची वसाहत स्नेहसावली अनुभवताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आणि त्यानी नमस्कार..करून मलाही तुमचा माना..ही  डोळ्यातून केलेली विनवणी मन गलबलून सोडते..जे एकदा आले ते शेवटच्या श्वासापर्यंत..आनंदवनाच्या प्रवासाला येतात..हेच घर..हेच आयुष्य..!


 आज ५५ बेडचे हे हॉस्पिटल डॉ. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली  इथे काम करीत आहे.

 डॉ. हृषीकेश गावंडे .. डॉ. कपिलदेव कदम हे इथे कसे काम चालते ते सांगतात..

आधुनिक उपचार पद्धती कुष्ठरोगी बांधवांसाठी इथे आहेत..

इथे केवळ कुष्ठरोगी नसून अपंग, मुक - बधीर मंडळींची संख्या असून कुष्ठरोगी बांधव कमी आहेत पण जे आहेत त्यांना त्यांचेकडे असलेले कौशल्य वाढवून त्या ज्या सेवा देतात त्याला मोबदला देऊन त्यास ताठपणे समाजात जगण्याचे बळ आनंदवन देत आहे..हे सर्वात महत्वाचे आहे..

डॉ. विकास तसेच डॉ. भारती..कौस्तुभ आमटे..डॉ. प्रकाश आणि डॉ . मंदाकिनी आमटे तसेच सारे आमटे कुटुंबीय..आपले विश्वस्त आणि निष्ठावान  कार्यकर्ते यांच्या बळावर इथली विकास स्वप्ने डोळस पणे पहात आहेत..

आनंदवन .. कुष्ठरोगी बांधवांसाठी जागतिक पातळीवर काम करणारी सर्वात संस्था आहे..समाजातील दानशूर आणि सामान्य माणूस त्यांच्या परीने संस्थे सोबत जोडला गेला आहे..पण शासनाचे याकडे पुरेसे लक्ष नाही..यानिमित्ताने का होईना..आनंदवन अधिक नव्या दिशेने कार्य करीत असल्याचे शासन पाहिल आणि आपली नजर इकडे वळवून त्यांना मदतीचा हात पुढे करतील .


- सुभाष इनामदार 

पुणे



Tuesday, January 28, 2025

पंढरीचा स्वामी

 












श्रुती विश्वकर्मा - मराठे आणि मेहेर परळीकर यांच्या स्वरांच्या आवर्तनातून तो भाव अतिशय उत्कटपणे रसिकांमध्ये पासरवितात.

इतकेच काय पण रचना संगीतबद्ध करताना जो देहभाव आपल्यात सामावून त्यातल्या काही रचना आशुतोष कुलकर्णी यांनी तन्मयतेने सादर करून जी दाद मिळविली तीही वाखाणण्यासारखी होती..

रचना तशा नव्या होत्या..लोकप्रिय नव्हत्या..पण त्यांचे हे तयारीचे मंचावरचे सादरीकरण विलक्षण आनंद देऊन जात होता..






सात्विक..सोज्वळ भव..शब्द स्वरातून इथे पाझरत होता..त्याचा गोडवा.. अधिक चाखावा असाच होता..

हा या प्रकारचा पहिलाच अनुभव होता. याचे अधिक प्रमाणात आणि विविध ठिकाणी सादरीकरण करण्याची आशुतोष कुलकर्णी यांची इच्छा आहे..

संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेल्या भक्ती रचनांचा ..पंढरीचा स्वामी.. हा कार्यक्रम, रविवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी राजलक्ष्मी सभागृह, कोथरूड इथे रसिकांना श्रीमंत करून गेला. चोखंदळ श्रोते तिकीट काढून उपस्थित होते..

शब्दात भरून राहिलेला भाव मंचावर अधिक उठून दिसत होता.

पद्मश्री पं. उल्हासजी कशाळकर यांच्या सुरेल, दैवी आवाजात काही रचना त्यानी रचल्या हा आगळा योग जुळून आला.. याशिवाय पं शौनक अभिषेकी, पं रघुनंदन पणशीकर, बेला शेंडे, अतुल खांडेकर या गायकांनी गायलेल्या काही रचना या कार्यक्रमात नव्याने इथे तयारीने सादर झाल्या.






'सृजन परंपरा 'प्रस्तुत 'पंढरीचा स्वामी' या कार्यक्रमात आशुतोष कुलकर्णी यांनी आजपर्यंत संगीत दिलेल्या नव्या रचना..दोन तयारीच्या गायकांकडून नव्याने तेव्हढ्याच जोरकस पद्धतीने सादर करण्याचे धनुष्य इतके उत्तम पेलले की हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकावा आणि त्यात तल्लीन होऊन जावे असा समोर आला.

भागीरथी मीसिंग..या आशुतोष कुलकर्णी यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील एक रचनाही रसिकांच्या पसंतीस उतरली..

कल्याण,बिलासखानी तोडी, गावती, मांड, जोगकंस, नंदभटियार असे विविध रागातील अभंगरचना अनुभवताना या संगीतकाराच्या संगीत नजरेला दाद द्यावीशी वाटते.







अभंगात पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांच्या विठ्ठल परणाला श्रोत्यांनी विशेष दाद दिली.

कार्यक्रमातील भक्तीरचना अध्यात्मिक सत्पुरुष पू अरविंद आगाशेकाका तसेच डॉ संगीता गोडबोले, रेवा लिमये यांच्या इथे अतिशय मनापासून गायल्या गेल्याने उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात ऐकल्या.






मेहेर परळीकर (पं अजय चक्रवर्ती यांचे शिष्य), श्रुती विश्वकर्मा-मराठे (विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांची शिष्या) हे युवा पिढीतील आश्वासक गायक यांनी त्या अतिशय मनापासून आणि आपल्या गळ्यातून तो भाव प्रकट करत ..वाद्यांच्या तालावर स्वार होत त्या रचना पेश केल्या जात होत्या.

अथर्व कुलकर्णी, अनुप कोलथे, आदित्य आपटे, जगमित्र लिंगाडे आणि कृष्णा साळुंखे या वादक कलाकारांच्या साथीने ज्या ताला..स्वरात झाल्या ..त्यामुळे मूळ रचना अधिक मनापासून ऐकल्या गेल्या.






रचनेतील विविधता..त्यामागचा उद्देश..रचना कशा संगीतबद्ध झाल्या त्या आठवणी. अशा विविध टप्प्यात हा कार्यक्रम रंगत गेला..त्याचे अधिक कारण म्हणजे स्नेहल दामले यांचे शब्द सागरात नेण्याचे आणि त्यातून पुन्हा दुसऱ्या रचनेची निवेदनातून केलेली उत्तम गुंफण..

विवेक पाध्ये आणि सुलभा तेरणीकर यांच्या पुढाकाराने कोथरूड येथील राजलक्ष्मी मंच नव्या सादरीकरणासाठी नेहमीसारखा सज्ज होता.


- Subhash Inamdar, 

Pune

subhashinamdar@gmail.com

Saturday, August 17, 2024

जयवंत दळवी जन्मशताब्दी सोहळा उत्साहात साजरा..!

ज्येष्ठ साहित्यिक ..नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुण्यात एस एम जोशी सभगृहात बेलवलकर ग्रुप आयोजित आणि डॉ. मानसी मागीकर संकल्पित कार्यक्रम.. दळवी समजून घेताना
जयवंत दळवी. जन्मशताब्दी निमित्त पहिला कार्यक्रम पुण्यात झाला. जयवंत दळवी यांच्यावर डॉक्टरेट केलेल्या डॉ. मानसी मागीकर दळवी यांच्याविषयी आपले विचार मांडले. दळवी यांच्या साहित्यावर आणि त्यांच्याविषयी ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय कुवळेकर यांनी आपल्या भाषणात दळवी यांच्या साहित्याचा आणि माणूसपणाचा वेध घेतला.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी..यांच्याशी संवाद साधला तो राजेश दामले यांनी..आणि दळवी यांच्या विषयी आणि त्यानी काम केलेल्या नाटकातील भूमिकांविषयी नीना कुलकर्णी भरभरून बोलल्या.
दळवी याना कोणताही विषय नाटकासाठी वर्ज्य नव्हत्या हे सांगून नाटककार प्रशांत दळवी यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा हीच कथावस्तू असते हे शिकविले. त्यांनी व्यक्तिरेखा सजीव, बहुरंगी केल्या..मध्यमवर्गीयांच्या दबलेल्या भावनेला दळवी यांनी वाचा दिली असेही ते म्हणाले आणि दळवी यांची राष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख निर्माण व्हावी ही अपेक्षाही त्यानी व्यक्त केली.
नाटककार दळवी यांच्याविषयी सारेच मनापासून बोलले.या कार्यक्रमाला रसिकांनी दिलेली भरभरून दाद.. आणि नाटककार जयवंत दळवी यांच्या लग्न, सावित्री,महासागर,पर्याय आणि पुरुष या नाटकातील अमित त्रिभुवन, विनिता पिंपळखरे आणि डॉ. मानसी मागीकर यांनी आपल्या वाचिक अभिनयातून साकार केलेले प्रसंग..याचे दर्शन घडले.
समीर बेलवलकर यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन केलेले आपले मनोगत आणि राजेश दामले यांनी कार्यक्रमाची आखणी करण्यात केलेले कौशल्य आणि नीना कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद..यातून नाटककार दळवी पुन्हा एकदा रसिकांच्या मनात कायम लक्षात राहिले.. यानिमित्ताने बेलवलकर ग्रुप यांनी प्रकाशित केलेला ऐसी अक्षरे हा खास अंक घरोघरी पोचला.

Sunday, June 23, 2024

तीन मिनीटात जादू करणारे ..बाबूजी

रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष गाणे यातून समग्र बाबुजी..म्हणजे गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांची अजरामर करणारी कारकीर्द रसिकांच्या हृदयात कोरली गेली.. अभिजात संगीत कलेची साधना केलेले बाबूजी यांनी सुगम संगीतात केलेली कामगिरी .. ऐकताना साधी आणि सोपी ..पण तीच गाणी बारकाईने पाहिली तर किती प्रतिभा प्रकट करणारी..याची प्रचिती ..एक धागा सुखाचा.. हा स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या चालीतील बारकावे समजून सांगणारा कार्यक्रम डॉ. मृदुला दाढे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत २२ जून २०२४ रोजी राजलक्ष्मी सभागृहात तुडुंब भरलेल्या आणि बाबुजी प्रेमी रसिकांसमोर सादर करून बाबुजी मनामनात पोचविले..
बाबुजी यांचेकडे संगीत कलेची पुरेपूर माहिती होती आणि चाल देण्यासाठी आवश्यक असणारी तंत्राची हुकूमत होती यामुळे त्यांची गाणी चिरस्थायी झाल्याचे डॉ. दाढे यांनी विविध गाण्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण करून रसिकांना त्याची महती पटवून दिली. शब्दांचे लालित्य , माधुर्य चालीत उमटले पाहिजे तर तुम्ही महान संगीतकार आहात.. शब्दांची मोडतोड तर दूरच पण त्यांनी शब्दांना खरचटू देखील दिले नाही..एकही ओरखडा त्या भावनेवर त्या काव्यावर येत नाही.. ती भावना अधिक लखलखीत होऊन तुमच्यापर्यंत कशी येईल हे त्यानी पाहिले.. म्हणून गदिमा यांचे श्रेष्ठ काव्य तितक्याच तोलामोलाच्या संगीतकाराच्या हातात पडल्यामुळे हा स्वरांचा ताजमहाल उभा झाल्याचे डॉ . मृदुला दाढे सांगतात.. त्यांच्या चालीचे वैशिष्टय म्हणजे पहिल्या दोन कडव्यांची एकसारखी चाल तर तिसऱ्या कडव्याची चाल वेगळ्या सुरावटीत असते.. गाण्याचा प्रसंग आणि त्यातील शब्द याना योग्य न्याय देऊन त्यांचे गाणे इतके उत्तम बांधलेले असते की तुम्ही ती म्हणताना तसूभर देखील बदल करू शकणार नाही..किंवा वेगळी ट्रीटमेंट देऊ शकणार नाही..
त्यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनात ..एक धागा सुखाचा कायम विणला म्हणून तर त्यातून काय सुख मिळाले याचा शोध बाबूजींच्या गाण्यातून घेणे हाच कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे दाढे यांनी इथे म्हटले.
हृदयी प्रीत जागते..जाणता अजाणता.. कारे दुरावा..कारे अबोला..अपराध माझा .. काल मी रघुनंदन पाहिले.. इथून दृष्ट काढते...निमिष एक सांग तू.. ज्योती कलश झलके.. दिवसा मागुनी दिवस चालले.. हे वेगळे राग वापरून केलेले गाणे.. त्या तिथे..पलीकडे.. एकाच या जन्मी जणू.. या सुखांनो या.. याशिवाय दोन लावण्याही सादर झाल्या काही धरीला मजवर राग.. कुणीतरी बोलवा दाजिबाला.. त्यातूनच ते किती महान संगीतकार - गायक होते याचा ठसा आपल्या सलग तीन तासाच्या प्रवासात उमटविला.
धनंजय कुरणे यांनी आपल्या संग्रहातील रेकॉर्ड प्रत्यक्ष ऐकवून तो काळ पुन्हा त्या सभागृहात आणला आणि कार्यक्रम अधिक परिणामकारक केला. कुरणे यांचे नेमके प्रश्न आणि त्यानी सांगितलेले सुधीर फडके यांचे आयुष्य त्यांच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.. सुधीर फडके व्यक्ती आणि साधक म्हणून श्रेष्ठ होते ते रसिकांच्या मनात कायम लक्षात राहील.
यासाठी पुण्यातले दोन उत्तम साथीदार नरेंद्र चिपळूणकर ..संवादिनी..आणि राजेंद्र हसबनिस यांनी दाढे यांच्या गाण्यांना तशीच तोलामोलाची साथ केली..त्यांच्याचमुळे हा कार्यक्रम विशेष दाद घेऊन गेला.. काळे यांची ध्वनिव्यवस्था योग्य न्याय देत होती.. कुरणे यांची वेगळी पण अभ्यासपूर्ण धाटणी आणि डॉ. मृदुला दाढे यांची गाण्यांची रसास्वाद करण्याची अधिक तीव्रता यातून दोन स्वतंत्र कार्यक्रमांची एकत्रित मेजवानी यातून मिळाली. पण या तीन तासात दोघांनाही पुरेसा वेळ मिळाला नाही..हे ही स्पष्ट करायला हवे.
दाढे यांचे प्रत्येक गाण्याबाबतीतले व्यक्त होणे हेच खरे यामागचे मर्म आहे..त्यामुळे सुधीर फडके यांचे संगीतकार म्हणून नाव का आणि शतकातील महान संगीतकार ते ओळखले जातात ते यातून अधिक लक्षात आणण्यात हा कार्यक्रम मोठे काम करतो..त्याबद्दब डॉ. मृदुला दाढे यांचे मनापासून आभार मानावे लागेल. एम डी प्रॉडक्शन च्या वतीने हा अतिशय उत्तम कार्यक्रम सादर झाला याबद्दल उदय मठकर आणि त्यांचे सहकारी यांचे आभार.. तसेच हा कार्यक्रम आयोजन करण्यामागे सभागृहाचे विवेक पाध्ये आणि डिंगणकर यांचेही. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् ही रेकॉर्ड लाऊन कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली. असे याचे अनेक ठिकाणी प्रयोग व्हावेत..त्यातून नवी गाणी या पद्धतीने त्यासर होऊन तीही अनेक पिढ्या ऐकली जातील..यासाठी हा कार्यक्रम सर्वत्र सादर व्हावा असे वाटते. ही आणि अशी गाणी जाणकारांनी ऐकावी..हीच सादरीकरणा मागील इच्छा असल्याचे शेवटी दाढे सांगतात..ही एक .. चळवळ.. आहे.. - subhash inamdar, Pune subhashinamdar@gmail.com तुम्ही संपर्क करू शकता..7021441810

Monday, May 27, 2024

अपर्णा संत यांनी शांताबाई यांच्य प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..!

अलौकिक शांताबाई... यातून अपर्णा संत यांनी त्यांच्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..!
शांता ज. शेळके... पाठ्यपुस्तकातून आपल्या कवितेतून ह्या सहीसह भेटलेल्या .. आणि नंतर गीतकार म्हणून लोकप्रिय झालेल्या शांताबाई..यांच्या आयुष्यातील लहानपण आणि पुढे मोठेपणी भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटातील गाण्यातून लक्षात राहिलेल्या अलौकिक प्रतिभेच्या शांताबाई सुगम संगीतात अभ्यासपूर्वक कार्यक्रमातून दिसणाऱ्या अपर्णा संत यांनी रविवारी पुण्यात सादर केलेल्या ..कार्यक्रमातून रसिकांच्या मनावर त्या अधिराज्य गाजवणाऱ्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..आणि शब्द..स्वर यांच्या माध्यमातून अनेकांच्या मनात कायम कोरल्या गेल्या.. कवितेच्या शब्दात दडलेला आशय आणि संगीतकाराने शब्दातून तो अर्थ कसा बाहेर आणला याचे प्रात्यक्षिक आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून ठळकपणे समोर आणला. प्रतिभा मग ती कवीची वा गीतकाराची असो..कशी फुलत जाते आणि संगीत देताना संगीतकाराने त्याला कसे फुलवून बाहेर आणले आहे याचे उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होता.
खरे तर अपर्णा संत या उत्तम गायिका म्हणून आपल्याला दिसल्या..पण इथे त्या दिसतात कविता..आणि गाणी यांच्यातील दडलेले नाते सांधणारी आशयाला आपल्या विश्लेषणातून बाहेर आणणारी विचारवंत म्हणून.. अनेक कवितेतील अर्थ..आणि संगीतकाराने त्याला स्वरातुन दिलेला योग्य न्याय याची अपर्णा संत यांनी अनेक उदाहरणातून रसिकांना दाखले देत समजावून सांगितले आहे.. शांता शेळके यांच्या अनेक कवितांना त्यानी आपल्या निवेदनातून प्रगट केले..पण पैठणी या कवितेला ज्या तन्मयतेने सादर केले ..ते एक उत्तम उदाहरण सांगता येईल. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आपल्या लहानपणी शांताबाई ..आणि अरुणा ढेरे कशा भेटल्या आणि त्यानी कसे गाणे ऐकले आणि पुण्यात हृदयनाथ मंगेशकर यांची कशी भेट घडवून आणली..आणि आयुष्याला कशी योग्य दिशा दिली ते अपर्णा संत आपल्या शब्दातून व्यक्त करतात.
अलौकिक शांताबाई... मध्ये अपर्णा संत स्वतः न गाता आपल्या किरण भिडे नायर ( मागे उभा मंगेश, ही वाट दूर जाते, हे श्यामसुंदर राजसा ), श्रुती देवस्थळी (माझी न मी राहिले, निळ्या आभाळी कातरवेळी, पहा टाकले पुसूनी डोळे , आणि अखेरचे जिवलगा राहिले दूर घर माझे ), पूर्वा जठार ( विकल मन आज..हे नाट्यगीत, ऋतू हिरवा) , चिन्मयी तांबे (हे एक झाड आहे, कळले तुला काही) या शिष्यांना गाणी सादर करायला लावून .. ती उत्तम तयारीने करायला लावून त्यांना नवा आत्मविश्वास दिला..
तर शुर आम्ही सरदार, तोच चंद्रमा नभात, रुपास भाळलो मी..श्रुती देवस्थळी सह, आणि अजब सोहळा..ही लोकप्रिय गाणी गाण्यासाठी जितेंद्र अभ्यंकर यांना आमंत्रित करून ती गाणी तयारीने सादर केली.
याशिवाय शांताबाईंच्या बालगीतांसाठी.. इरा वेदपाठक आणि स्वरा बंकापुरे या छोट्या मुलींना तयार करून त्यांचेकडून दोन गाणी रसिकांना ऐकवली. त्यातले किलबिल किलबिल रसिकांनी डोक्यावर घेतले.
अपर्णा संत आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी राजा सारंगा..ह्या कोळी गीतातल्या सुंदर हार्मनी मधून रसिकांना मंत्रमुग्ध केले.. गाण्याला स्वराने आणि शब्दाने ती धून पुन्हा पुन्हा आळविणाऱ्या गीताने वातावरण भारावून गेले होते. या पाठीमागे असलेल्या उत्तम संगीत संयोजक मिलिंद गुणे यांनाही दाद द्यायला पाहिजे..हे गाणे जून मध्ये शांताबाई शेळके यांच्या स्मृतीला भावपूर्ण वंदन म्हणून सादर करण्यासाठी तयार केले होते.
संपूर्ण कार्यक्रमाची साथ केदार परांजपे, राजेंद्र दूरकर, निलेश देशपांडे, अजय अत्रे आणि प्रसन्न बाम यांनी उत्तम संगत करून तो रंगतदार केला. त्यांचीही यांच्या यशामागे मेहनत दिसली. अलौकिक शांताबाई... याची संकल्पना, संहिता आणि निवेदन करून अपर्णा संत यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले..खरोखर असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूपच मेहनत आणि तयारी करून तो सादर करावा लागतो..त्याचे सारे श्रेय गायक..गुरू..आणि संगीत अभ्यासक अपर्णा संत यांना मनापासून द्यायला हवे.. यासाठी डॉ. अरुणा ढेरे मुद्दाम उपस्थित होत्या..आणि सुजाण रसिक सभागृहात दाद देत होता. अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना रसिक तिकीट काढून गर्दी करतात ही आगळी गोष्ट आहे..
- सुभाष इनामदार, पुणे

Tuesday, May 7, 2024

शब्द सुरांचा हा हिंदोळा...तू अन् मी..

शब्द शब्द जणू साद मनीची सूर चेतवीती याद मनीची गाणी अशी ती लळा जिव्हाळा शब्द सुरांचा हा हिंदोळा... असा शब्द सुरांचा हिंदोळा रविवारी ५ मे २४ रोजी संध्याकाळी पुण्यात रसिकांनी अनुभवला.. काही स्वरचित रचना यात सहज सुंदर भाव घेऊन प्रकटल्या..तर काही नवीन कवींच्या..काही तुमच्या आमच्या आवडीच्या..तर उत्तम गजलचे नमुने ..असा सारा स्वर हिंदोळा उत्तमरित्या मनाला आनंद देत सादर झाला.. कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या संगीत क्षेत्रात तीस वर्षाहून अधिक काळ आपल्या कलेतून रसिकांना आणि नवीन कलावंताना प्रोत्साहन देणाऱ्या जोडीने ...तू अन् मी..या नावाने नवा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कुमार आणि श्रुती यांच्या संसाराला पंचवीस वर्षे.. कुमारजी यांची पन्नाशी आणि संगीत क्षेत्रातील तीस वर्षे असा हा एकूण प्रवास सुरू आहे..तेही उभयतांच्या जोडीने..एकमेकांच्या साक्षीने.. कुमार करंदीकर यांनी संवादिनी संगतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.. अनेक नामवंत गायकांच्या मैफलीला साथ केली.. त्यांना गजानन वाटवे यांचे मार्गदर्शन लाभले नंतर.. काही रचना संगीतबद्ध केल्या.. आणि ते शशिकला शिरगोपिकर यांचेकडे गजल शिकण्यासाठी वळले..आणि त्यात गजल समजून त्या पेटीवर साथ करीत गायला सुरुवात केली..त्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले..आणि गायक..साथीदार.. संगीतकार म्हणून नाव कमावले.. तसेच श्रुती करंदीकर..यांनी रीतसर गायनाचे शिक्षण घेतले..गजानन वाटवे यांचेकडे सुगम गायनाचे धडे घेतले.. आणि मराठी - हिदी.. गाण्यांची मैफल सुरू केली..कुमार प्रमाणे गजल कडे त्याही वळल्या ..स्वतः गाण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली..आणि दोघे मिळून असा नवा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.. उत्तम शब्दांची जाण..कवितेची निवड..आणि संगीत देण्याची तयारी..यातून हिंदोळा प्रस्तुत.. तू अन् मी.. असा नवा कार्यक्रम सादर करण्याची संधी घेऊन रसिकांना आपल्या अभ्यासपूर्ण गाण्यातून बांधून ठेवण्याची हातोटी साधली.
कार्यक्रमात नेहमीची गाणी न घेता नव्या रचना ..घेऊन त्यातील शब्दांना कानात साठविण्याची संधी त्यानी यानिमित्त घेतली.. नवीन चाली आणि नव्या रचना इथे ऐकायला मिळणार याची खात्री असूनही रसिकांनी या गाण्यांना .. चालींना तशीच दाद दिली..हे कौतुकास्पद आहे. तू सप्त सूर माझे.. कुमार..मग तुझ्याचसाठी कितीदा..हे श्रुती यांचे गाणे ऐकत आनंद घेत दाद देत..स्नेहल दामले यांच्या सहज आणि उत्स्फूर्त निवेदनाने गाणी ऐकत रसिक तृप्त होत होते.. धुंद तू धुंद मी, तू येता या फुलांना अशी दोघानी स्वरांनी नटविलेली गाणी त्यातले भाव अधिक उठावदार करत होती.. मधूनच. आपल्या चुका कबूल करत जाहल्या काही चुकाचे दर्शन श्रुती देत होत्या.. कधी कुठे भेटणार..मग फांद्यावरी बांधिले मुलींनी हिंदोळे. श्रुती..आणि मोहूनिया तुजसंगे..असे कुमार म्हणत गजाजन वाटवे यांच्या स्मृतीला उजाळा दिला गेला.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा.. इलाही जमादार यांची गजल मधूनच वास्तवाची भान देणारी ठळकपणे अधोरेखित होते..ती कुमार करंदीकर यांच्या उत्तम सादरीकरणातून. सांजवेळी सोबतीला घेऊन श्रुती करंदीकर.. कुमार यांच्या अधिक जवळी गेल्या.. तर संजीवनी बोकील यांच्या ढळे वाऱ्याचा पदर..सारखे मालकंस रागात बांधलेले गाणे मनात खोलवर परिणाम करून जाते.. मराठी गजलकडे वळताना गडे सोडून दे रुसवा..ही दीपक करंदीकर यांची नवी रचना कुमार तेव्हढ्याच आत्मीयतेने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवितात.. मग सुरू होतो..शशिकला शिरगोपीकर यांची तयार करून घेतलेल्या उर्दू गजलांची .. बात निकलेगी तो.. तुमको देखा तो.. तुमको हम दिलमे.. दीलमे एक लहरसी.. तुम अपना रंजो गम.. सारख्या गजल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात..त्या कुमार आणि श्रुती दोघानी ताकदीने सादर केल्या. त्याला शशिकला शिगोपिकर यांनी उपस्थित राहून दादही दिली. ये दिल तुम बिन..हे दोघानी ताकदीने सादर केलेली रचना.. आणि गो जरासी बातपर..ही गजल अर्थासह पेश करून कुमार करंदीकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गाण्याचा आनंद दिला. अखेर रंजिश ही सही..ही रचना कुमार..श्रुती यांनी रसिकांच्या मनात साठवून ठेवताना ..ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है..हेच दाखवून दिले.. नवीन रचना आणि त्यात जुन्यांची आठवण करत..हा शब्द सुरांचा प्रवास पुढेही नवीन मालिकेत सुरू ठवण्याचे आश्वासन देऊन.. तू अन् मी.. चा पहिला एपिसोड इथेच संपवितात..
यासाठी अरुण गवई..केदार तळणीकर..आणि मिहिर भडकमकर यांची स्वर तालाची संगत शब्दांना अधिकाधिक परीपूर्ण करत होती.. आणि स्नेहल दामले यांचे ओघवते शब्द मनाला अधिक भिडत होते..कधी कधी कमीत कमी शब्दातून गहरा असर व्यक्त करत होता..
असे प्रयोग रसिकांना नक्कीच भावतात..पण त्यासाठी त्यांची अधिकाधिक उपस्थितीची गरज आहे.. तरच हे नव्या रचना सादर करायला कलावंताना प्रोत्साहन मिळेल. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com subhashinamdar@gmail.com