Monday, May 27, 2024
अपर्णा संत यांनी शांताबाई यांच्य प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..!
अलौकिक शांताबाई... यातून अपर्णा संत यांनी त्यांच्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..!
शांता ज. शेळके... पाठ्यपुस्तकातून आपल्या कवितेतून ह्या सहीसह भेटलेल्या .. आणि नंतर गीतकार म्हणून लोकप्रिय झालेल्या शांताबाई..यांच्या आयुष्यातील लहानपण आणि पुढे मोठेपणी भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटातील गाण्यातून लक्षात राहिलेल्या अलौकिक प्रतिभेच्या शांताबाई सुगम संगीतात अभ्यासपूर्वक कार्यक्रमातून दिसणाऱ्या अपर्णा संत यांनी रविवारी पुण्यात सादर केलेल्या ..कार्यक्रमातून रसिकांच्या मनावर त्या अधिराज्य गाजवणाऱ्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..आणि शब्द..स्वर यांच्या माध्यमातून अनेकांच्या मनात कायम कोरल्या गेल्या..
कवितेच्या शब्दात दडलेला आशय आणि संगीतकाराने शब्दातून तो अर्थ कसा बाहेर आणला याचे प्रात्यक्षिक आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून ठळकपणे समोर आणला.
प्रतिभा मग ती कवीची वा गीतकाराची असो..कशी फुलत जाते आणि संगीत देताना संगीतकाराने त्याला कसे फुलवून बाहेर आणले आहे याचे उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होता.
खरे तर अपर्णा संत या उत्तम गायिका म्हणून आपल्याला दिसल्या..पण इथे त्या दिसतात कविता..आणि गाणी यांच्यातील दडलेले नाते सांधणारी आशयाला आपल्या विश्लेषणातून बाहेर आणणारी विचारवंत म्हणून..
अनेक कवितेतील अर्थ..आणि संगीतकाराने त्याला स्वरातुन दिलेला योग्य न्याय याची अपर्णा संत यांनी अनेक उदाहरणातून रसिकांना दाखले देत समजावून सांगितले आहे..
शांता शेळके यांच्या अनेक कवितांना त्यानी आपल्या निवेदनातून प्रगट केले..पण पैठणी या कवितेला ज्या तन्मयतेने सादर केले ..ते एक उत्तम उदाहरण सांगता येईल.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आपल्या लहानपणी शांताबाई ..आणि अरुणा ढेरे कशा भेटल्या आणि त्यानी कसे गाणे ऐकले आणि पुण्यात हृदयनाथ मंगेशकर यांची कशी भेट घडवून आणली..आणि आयुष्याला कशी योग्य दिशा दिली ते अपर्णा संत आपल्या शब्दातून व्यक्त करतात.
अलौकिक शांताबाई... मध्ये अपर्णा संत स्वतः न गाता आपल्या किरण भिडे नायर ( मागे उभा मंगेश, ही वाट दूर जाते, हे श्यामसुंदर राजसा ), श्रुती देवस्थळी (माझी न मी राहिले, निळ्या आभाळी कातरवेळी, पहा टाकले पुसूनी डोळे , आणि अखेरचे जिवलगा राहिले दूर घर माझे ), पूर्वा जठार ( विकल मन आज..हे नाट्यगीत, ऋतू हिरवा) , चिन्मयी तांबे (हे एक झाड आहे, कळले तुला काही) या शिष्यांना गाणी सादर करायला लावून .. ती उत्तम तयारीने करायला लावून त्यांना नवा आत्मविश्वास दिला..
तर शुर आम्ही सरदार, तोच चंद्रमा नभात, रुपास भाळलो मी..श्रुती देवस्थळी सह, आणि अजब सोहळा..ही लोकप्रिय गाणी गाण्यासाठी जितेंद्र अभ्यंकर यांना आमंत्रित करून ती गाणी तयारीने सादर केली.
याशिवाय शांताबाईंच्या बालगीतांसाठी.. इरा वेदपाठक आणि स्वरा बंकापुरे या छोट्या मुलींना तयार करून त्यांचेकडून दोन गाणी रसिकांना
ऐकवली. त्यातले किलबिल किलबिल रसिकांनी डोक्यावर घेतले.
अपर्णा संत आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी राजा सारंगा..ह्या कोळी गीतातल्या सुंदर हार्मनी मधून रसिकांना मंत्रमुग्ध केले.. गाण्याला स्वराने आणि शब्दाने ती धून पुन्हा पुन्हा आळविणाऱ्या गीताने वातावरण भारावून गेले होते.
या पाठीमागे असलेल्या उत्तम संगीत संयोजक मिलिंद गुणे यांनाही दाद द्यायला पाहिजे..हे गाणे जून मध्ये शांताबाई शेळके यांच्या स्मृतीला भावपूर्ण वंदन म्हणून सादर करण्यासाठी तयार केले होते.
संपूर्ण कार्यक्रमाची साथ केदार परांजपे, राजेंद्र दूरकर, निलेश देशपांडे, अजय अत्रे आणि प्रसन्न बाम यांनी उत्तम संगत करून तो रंगतदार केला. त्यांचीही यांच्या यशामागे मेहनत दिसली.
अलौकिक शांताबाई... याची संकल्पना, संहिता आणि निवेदन करून अपर्णा संत यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले..खरोखर असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूपच मेहनत आणि तयारी करून तो सादर करावा लागतो..त्याचे सारे श्रेय गायक..गुरू..आणि संगीत अभ्यासक अपर्णा संत यांना मनापासून द्यायला हवे.. यासाठी डॉ. अरुणा ढेरे मुद्दाम उपस्थित होत्या..आणि सुजाण रसिक सभागृहात दाद देत होता.
अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना रसिक तिकीट काढून गर्दी करतात ही आगळी गोष्ट आहे..
- सुभाष इनामदार, पुणे
Tuesday, May 7, 2024
शब्द सुरांचा हा हिंदोळा...तू अन् मी..
शब्द शब्द जणू साद मनीची
सूर चेतवीती याद मनीची
गाणी अशी ती लळा जिव्हाळा
शब्द सुरांचा हा हिंदोळा...
असा शब्द सुरांचा हिंदोळा रविवारी ५ मे २४ रोजी संध्याकाळी पुण्यात रसिकांनी अनुभवला..
काही स्वरचित रचना यात सहज सुंदर भाव घेऊन प्रकटल्या..तर काही नवीन कवींच्या..काही तुमच्या आमच्या आवडीच्या..तर उत्तम गजलचे नमुने ..असा सारा स्वर हिंदोळा उत्तमरित्या मनाला आनंद देत सादर झाला..
कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या संगीत क्षेत्रात तीस वर्षाहून अधिक काळ आपल्या कलेतून रसिकांना आणि नवीन कलावंताना प्रोत्साहन देणाऱ्या जोडीने ...तू अन् मी..या नावाने नवा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कुमार आणि श्रुती यांच्या संसाराला पंचवीस वर्षे.. कुमारजी यांची पन्नाशी आणि संगीत क्षेत्रातील तीस वर्षे असा हा एकूण प्रवास सुरू आहे..तेही उभयतांच्या जोडीने..एकमेकांच्या साक्षीने..
कुमार करंदीकर यांनी संवादिनी संगतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.. अनेक नामवंत गायकांच्या मैफलीला साथ केली.. त्यांना गजानन वाटवे यांचे मार्गदर्शन लाभले
नंतर.. काही रचना संगीतबद्ध केल्या.. आणि ते शशिकला शिरगोपिकर यांचेकडे गजल शिकण्यासाठी वळले..आणि त्यात गजल समजून त्या पेटीवर साथ करीत गायला सुरुवात केली..त्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले..आणि गायक..साथीदार.. संगीतकार म्हणून नाव कमावले..
तसेच श्रुती करंदीकर..यांनी रीतसर गायनाचे शिक्षण घेतले..गजानन वाटवे यांचेकडे सुगम गायनाचे धडे घेतले.. आणि मराठी - हिदी.. गाण्यांची मैफल सुरू केली..कुमार प्रमाणे गजल कडे त्याही वळल्या ..स्वतः गाण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली..आणि दोघे मिळून असा नवा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली..
उत्तम शब्दांची जाण..कवितेची निवड..आणि संगीत देण्याची तयारी..यातून हिंदोळा प्रस्तुत.. तू अन् मी.. असा नवा कार्यक्रम सादर करण्याची संधी घेऊन रसिकांना आपल्या अभ्यासपूर्ण गाण्यातून बांधून ठेवण्याची हातोटी साधली.
कार्यक्रमात नेहमीची गाणी न घेता नव्या रचना ..घेऊन त्यातील शब्दांना कानात साठविण्याची संधी त्यानी यानिमित्त घेतली.. नवीन चाली आणि नव्या रचना इथे ऐकायला मिळणार याची खात्री असूनही रसिकांनी या गाण्यांना .. चालींना तशीच दाद दिली..हे कौतुकास्पद आहे.
तू सप्त सूर माझे.. कुमार..मग तुझ्याचसाठी कितीदा..हे श्रुती यांचे गाणे ऐकत आनंद घेत दाद देत..स्नेहल दामले यांच्या सहज आणि उत्स्फूर्त निवेदनाने गाणी ऐकत रसिक तृप्त होत होते..
धुंद तू धुंद मी, तू येता या फुलांना अशी दोघानी स्वरांनी नटविलेली गाणी त्यातले भाव अधिक उठावदार करत होती..
मधूनच. आपल्या चुका कबूल करत जाहल्या काही चुकाचे दर्शन श्रुती देत होत्या..
कधी कुठे भेटणार..मग फांद्यावरी बांधिले मुलींनी हिंदोळे. श्रुती..आणि मोहूनिया तुजसंगे..असे कुमार म्हणत गजाजन वाटवे यांच्या स्मृतीला उजाळा दिला गेला.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा..
इलाही जमादार यांची गजल मधूनच वास्तवाची भान देणारी ठळकपणे अधोरेखित होते..ती कुमार करंदीकर यांच्या उत्तम सादरीकरणातून.
सांजवेळी सोबतीला घेऊन श्रुती करंदीकर.. कुमार यांच्या अधिक जवळी गेल्या.. तर संजीवनी बोकील यांच्या ढळे वाऱ्याचा पदर..सारखे मालकंस रागात बांधलेले गाणे मनात खोलवर परिणाम करून जाते..
मराठी गजलकडे वळताना गडे सोडून दे रुसवा..ही दीपक करंदीकर यांची नवी रचना कुमार तेव्हढ्याच आत्मीयतेने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवितात..
मग सुरू होतो..शशिकला शिरगोपीकर यांची तयार करून घेतलेल्या उर्दू गजलांची .. बात निकलेगी तो.. तुमको देखा तो.. तुमको हम दिलमे.. दीलमे एक लहरसी.. तुम अपना रंजो गम.. सारख्या गजल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात..त्या कुमार आणि श्रुती दोघानी ताकदीने सादर केल्या.
त्याला शशिकला शिगोपिकर यांनी उपस्थित राहून दादही दिली.
ये दिल तुम बिन..हे दोघानी ताकदीने सादर केलेली रचना.. आणि गो जरासी बातपर..ही गजल अर्थासह पेश करून कुमार करंदीकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गाण्याचा आनंद दिला.
अखेर रंजिश ही सही..ही रचना कुमार..श्रुती यांनी रसिकांच्या मनात साठवून ठेवताना ..ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है..हेच दाखवून दिले..
नवीन रचना आणि त्यात जुन्यांची आठवण करत..हा शब्द सुरांचा प्रवास पुढेही नवीन मालिकेत सुरू ठवण्याचे आश्वासन देऊन.. तू अन् मी.. चा पहिला एपिसोड इथेच संपवितात..
यासाठी अरुण गवई..केदार तळणीकर..आणि मिहिर भडकमकर यांची स्वर तालाची संगत शब्दांना अधिकाधिक परीपूर्ण करत होती..
आणि स्नेहल दामले यांचे ओघवते शब्द मनाला अधिक भिडत होते..कधी कधी कमीत कमी शब्दातून गहरा असर व्यक्त करत होता..
असे प्रयोग रसिकांना नक्कीच भावतात..पण त्यासाठी त्यांची अधिकाधिक उपस्थितीची गरज आहे.. तरच हे नव्या रचना सादर करायला कलावंताना प्रोत्साहन मिळेल.
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
subhashinamdar@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)

















