Saturday, August 17, 2024

जयवंत दळवी जन्मशताब्दी सोहळा उत्साहात साजरा..!

ज्येष्ठ साहित्यिक ..नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुण्यात एस एम जोशी सभगृहात बेलवलकर ग्रुप आयोजित आणि डॉ. मानसी मागीकर संकल्पित कार्यक्रम.. दळवी समजून घेताना
जयवंत दळवी. जन्मशताब्दी निमित्त पहिला कार्यक्रम पुण्यात झाला. जयवंत दळवी यांच्यावर डॉक्टरेट केलेल्या डॉ. मानसी मागीकर दळवी यांच्याविषयी आपले विचार मांडले. दळवी यांच्या साहित्यावर आणि त्यांच्याविषयी ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय कुवळेकर यांनी आपल्या भाषणात दळवी यांच्या साहित्याचा आणि माणूसपणाचा वेध घेतला.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी..यांच्याशी संवाद साधला तो राजेश दामले यांनी..आणि दळवी यांच्या विषयी आणि त्यानी काम केलेल्या नाटकातील भूमिकांविषयी नीना कुलकर्णी भरभरून बोलल्या.
दळवी याना कोणताही विषय नाटकासाठी वर्ज्य नव्हत्या हे सांगून नाटककार प्रशांत दळवी यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा हीच कथावस्तू असते हे शिकविले. त्यांनी व्यक्तिरेखा सजीव, बहुरंगी केल्या..मध्यमवर्गीयांच्या दबलेल्या भावनेला दळवी यांनी वाचा दिली असेही ते म्हणाले आणि दळवी यांची राष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख निर्माण व्हावी ही अपेक्षाही त्यानी व्यक्त केली.
नाटककार दळवी यांच्याविषयी सारेच मनापासून बोलले.या कार्यक्रमाला रसिकांनी दिलेली भरभरून दाद.. आणि नाटककार जयवंत दळवी यांच्या लग्न, सावित्री,महासागर,पर्याय आणि पुरुष या नाटकातील अमित त्रिभुवन, विनिता पिंपळखरे आणि डॉ. मानसी मागीकर यांनी आपल्या वाचिक अभिनयातून साकार केलेले प्रसंग..याचे दर्शन घडले.
समीर बेलवलकर यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन केलेले आपले मनोगत आणि राजेश दामले यांनी कार्यक्रमाची आखणी करण्यात केलेले कौशल्य आणि नीना कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद..यातून नाटककार दळवी पुन्हा एकदा रसिकांच्या मनात कायम लक्षात राहिले.. यानिमित्ताने बेलवलकर ग्रुप यांनी प्रकाशित केलेला ऐसी अक्षरे हा खास अंक घरोघरी पोचला.

Sunday, June 23, 2024

तीन मिनीटात जादू करणारे ..बाबूजी

रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष गाणे यातून समग्र बाबुजी..म्हणजे गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांची अजरामर करणारी कारकीर्द रसिकांच्या हृदयात कोरली गेली.. अभिजात संगीत कलेची साधना केलेले बाबूजी यांनी सुगम संगीतात केलेली कामगिरी .. ऐकताना साधी आणि सोपी ..पण तीच गाणी बारकाईने पाहिली तर किती प्रतिभा प्रकट करणारी..याची प्रचिती ..एक धागा सुखाचा.. हा स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या चालीतील बारकावे समजून सांगणारा कार्यक्रम डॉ. मृदुला दाढे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत २२ जून २०२४ रोजी राजलक्ष्मी सभागृहात तुडुंब भरलेल्या आणि बाबुजी प्रेमी रसिकांसमोर सादर करून बाबुजी मनामनात पोचविले..
बाबुजी यांचेकडे संगीत कलेची पुरेपूर माहिती होती आणि चाल देण्यासाठी आवश्यक असणारी तंत्राची हुकूमत होती यामुळे त्यांची गाणी चिरस्थायी झाल्याचे डॉ. दाढे यांनी विविध गाण्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण करून रसिकांना त्याची महती पटवून दिली. शब्दांचे लालित्य , माधुर्य चालीत उमटले पाहिजे तर तुम्ही महान संगीतकार आहात.. शब्दांची मोडतोड तर दूरच पण त्यांनी शब्दांना खरचटू देखील दिले नाही..एकही ओरखडा त्या भावनेवर त्या काव्यावर येत नाही.. ती भावना अधिक लखलखीत होऊन तुमच्यापर्यंत कशी येईल हे त्यानी पाहिले.. म्हणून गदिमा यांचे श्रेष्ठ काव्य तितक्याच तोलामोलाच्या संगीतकाराच्या हातात पडल्यामुळे हा स्वरांचा ताजमहाल उभा झाल्याचे डॉ . मृदुला दाढे सांगतात.. त्यांच्या चालीचे वैशिष्टय म्हणजे पहिल्या दोन कडव्यांची एकसारखी चाल तर तिसऱ्या कडव्याची चाल वेगळ्या सुरावटीत असते.. गाण्याचा प्रसंग आणि त्यातील शब्द याना योग्य न्याय देऊन त्यांचे गाणे इतके उत्तम बांधलेले असते की तुम्ही ती म्हणताना तसूभर देखील बदल करू शकणार नाही..किंवा वेगळी ट्रीटमेंट देऊ शकणार नाही..
त्यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनात ..एक धागा सुखाचा कायम विणला म्हणून तर त्यातून काय सुख मिळाले याचा शोध बाबूजींच्या गाण्यातून घेणे हाच कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे दाढे यांनी इथे म्हटले.
हृदयी प्रीत जागते..जाणता अजाणता.. कारे दुरावा..कारे अबोला..अपराध माझा .. काल मी रघुनंदन पाहिले.. इथून दृष्ट काढते...निमिष एक सांग तू.. ज्योती कलश झलके.. दिवसा मागुनी दिवस चालले.. हे वेगळे राग वापरून केलेले गाणे.. त्या तिथे..पलीकडे.. एकाच या जन्मी जणू.. या सुखांनो या.. याशिवाय दोन लावण्याही सादर झाल्या काही धरीला मजवर राग.. कुणीतरी बोलवा दाजिबाला.. त्यातूनच ते किती महान संगीतकार - गायक होते याचा ठसा आपल्या सलग तीन तासाच्या प्रवासात उमटविला.
धनंजय कुरणे यांनी आपल्या संग्रहातील रेकॉर्ड प्रत्यक्ष ऐकवून तो काळ पुन्हा त्या सभागृहात आणला आणि कार्यक्रम अधिक परिणामकारक केला. कुरणे यांचे नेमके प्रश्न आणि त्यानी सांगितलेले सुधीर फडके यांचे आयुष्य त्यांच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.. सुधीर फडके व्यक्ती आणि साधक म्हणून श्रेष्ठ होते ते रसिकांच्या मनात कायम लक्षात राहील.
यासाठी पुण्यातले दोन उत्तम साथीदार नरेंद्र चिपळूणकर ..संवादिनी..आणि राजेंद्र हसबनिस यांनी दाढे यांच्या गाण्यांना तशीच तोलामोलाची साथ केली..त्यांच्याचमुळे हा कार्यक्रम विशेष दाद घेऊन गेला.. काळे यांची ध्वनिव्यवस्था योग्य न्याय देत होती.. कुरणे यांची वेगळी पण अभ्यासपूर्ण धाटणी आणि डॉ. मृदुला दाढे यांची गाण्यांची रसास्वाद करण्याची अधिक तीव्रता यातून दोन स्वतंत्र कार्यक्रमांची एकत्रित मेजवानी यातून मिळाली. पण या तीन तासात दोघांनाही पुरेसा वेळ मिळाला नाही..हे ही स्पष्ट करायला हवे.
दाढे यांचे प्रत्येक गाण्याबाबतीतले व्यक्त होणे हेच खरे यामागचे मर्म आहे..त्यामुळे सुधीर फडके यांचे संगीतकार म्हणून नाव का आणि शतकातील महान संगीतकार ते ओळखले जातात ते यातून अधिक लक्षात आणण्यात हा कार्यक्रम मोठे काम करतो..त्याबद्दब डॉ. मृदुला दाढे यांचे मनापासून आभार मानावे लागेल. एम डी प्रॉडक्शन च्या वतीने हा अतिशय उत्तम कार्यक्रम सादर झाला याबद्दल उदय मठकर आणि त्यांचे सहकारी यांचे आभार.. तसेच हा कार्यक्रम आयोजन करण्यामागे सभागृहाचे विवेक पाध्ये आणि डिंगणकर यांचेही. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् ही रेकॉर्ड लाऊन कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली. असे याचे अनेक ठिकाणी प्रयोग व्हावेत..त्यातून नवी गाणी या पद्धतीने त्यासर होऊन तीही अनेक पिढ्या ऐकली जातील..यासाठी हा कार्यक्रम सर्वत्र सादर व्हावा असे वाटते. ही आणि अशी गाणी जाणकारांनी ऐकावी..हीच सादरीकरणा मागील इच्छा असल्याचे शेवटी दाढे सांगतात..ही एक .. चळवळ.. आहे.. - subhash inamdar, Pune subhashinamdar@gmail.com तुम्ही संपर्क करू शकता..7021441810

Monday, May 27, 2024

अपर्णा संत यांनी शांताबाई यांच्य प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..!

अलौकिक शांताबाई... यातून अपर्णा संत यांनी त्यांच्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..!
शांता ज. शेळके... पाठ्यपुस्तकातून आपल्या कवितेतून ह्या सहीसह भेटलेल्या .. आणि नंतर गीतकार म्हणून लोकप्रिय झालेल्या शांताबाई..यांच्या आयुष्यातील लहानपण आणि पुढे मोठेपणी भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटातील गाण्यातून लक्षात राहिलेल्या अलौकिक प्रतिभेच्या शांताबाई सुगम संगीतात अभ्यासपूर्वक कार्यक्रमातून दिसणाऱ्या अपर्णा संत यांनी रविवारी पुण्यात सादर केलेल्या ..कार्यक्रमातून रसिकांच्या मनावर त्या अधिराज्य गाजवणाऱ्या प्रतिभेला पुन्हा जिवंत केले..आणि शब्द..स्वर यांच्या माध्यमातून अनेकांच्या मनात कायम कोरल्या गेल्या.. कवितेच्या शब्दात दडलेला आशय आणि संगीतकाराने शब्दातून तो अर्थ कसा बाहेर आणला याचे प्रात्यक्षिक आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून ठळकपणे समोर आणला. प्रतिभा मग ती कवीची वा गीतकाराची असो..कशी फुलत जाते आणि संगीत देताना संगीतकाराने त्याला कसे फुलवून बाहेर आणले आहे याचे उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होता.
खरे तर अपर्णा संत या उत्तम गायिका म्हणून आपल्याला दिसल्या..पण इथे त्या दिसतात कविता..आणि गाणी यांच्यातील दडलेले नाते सांधणारी आशयाला आपल्या विश्लेषणातून बाहेर आणणारी विचारवंत म्हणून.. अनेक कवितेतील अर्थ..आणि संगीतकाराने त्याला स्वरातुन दिलेला योग्य न्याय याची अपर्णा संत यांनी अनेक उदाहरणातून रसिकांना दाखले देत समजावून सांगितले आहे.. शांता शेळके यांच्या अनेक कवितांना त्यानी आपल्या निवेदनातून प्रगट केले..पण पैठणी या कवितेला ज्या तन्मयतेने सादर केले ..ते एक उत्तम उदाहरण सांगता येईल. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आपल्या लहानपणी शांताबाई ..आणि अरुणा ढेरे कशा भेटल्या आणि त्यानी कसे गाणे ऐकले आणि पुण्यात हृदयनाथ मंगेशकर यांची कशी भेट घडवून आणली..आणि आयुष्याला कशी योग्य दिशा दिली ते अपर्णा संत आपल्या शब्दातून व्यक्त करतात.
अलौकिक शांताबाई... मध्ये अपर्णा संत स्वतः न गाता आपल्या किरण भिडे नायर ( मागे उभा मंगेश, ही वाट दूर जाते, हे श्यामसुंदर राजसा ), श्रुती देवस्थळी (माझी न मी राहिले, निळ्या आभाळी कातरवेळी, पहा टाकले पुसूनी डोळे , आणि अखेरचे जिवलगा राहिले दूर घर माझे ), पूर्वा जठार ( विकल मन आज..हे नाट्यगीत, ऋतू हिरवा) , चिन्मयी तांबे (हे एक झाड आहे, कळले तुला काही) या शिष्यांना गाणी सादर करायला लावून .. ती उत्तम तयारीने करायला लावून त्यांना नवा आत्मविश्वास दिला..
तर शुर आम्ही सरदार, तोच चंद्रमा नभात, रुपास भाळलो मी..श्रुती देवस्थळी सह, आणि अजब सोहळा..ही लोकप्रिय गाणी गाण्यासाठी जितेंद्र अभ्यंकर यांना आमंत्रित करून ती गाणी तयारीने सादर केली.
याशिवाय शांताबाईंच्या बालगीतांसाठी.. इरा वेदपाठक आणि स्वरा बंकापुरे या छोट्या मुलींना तयार करून त्यांचेकडून दोन गाणी रसिकांना ऐकवली. त्यातले किलबिल किलबिल रसिकांनी डोक्यावर घेतले.
अपर्णा संत आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी राजा सारंगा..ह्या कोळी गीतातल्या सुंदर हार्मनी मधून रसिकांना मंत्रमुग्ध केले.. गाण्याला स्वराने आणि शब्दाने ती धून पुन्हा पुन्हा आळविणाऱ्या गीताने वातावरण भारावून गेले होते. या पाठीमागे असलेल्या उत्तम संगीत संयोजक मिलिंद गुणे यांनाही दाद द्यायला पाहिजे..हे गाणे जून मध्ये शांताबाई शेळके यांच्या स्मृतीला भावपूर्ण वंदन म्हणून सादर करण्यासाठी तयार केले होते.
संपूर्ण कार्यक्रमाची साथ केदार परांजपे, राजेंद्र दूरकर, निलेश देशपांडे, अजय अत्रे आणि प्रसन्न बाम यांनी उत्तम संगत करून तो रंगतदार केला. त्यांचीही यांच्या यशामागे मेहनत दिसली. अलौकिक शांताबाई... याची संकल्पना, संहिता आणि निवेदन करून अपर्णा संत यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले..खरोखर असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूपच मेहनत आणि तयारी करून तो सादर करावा लागतो..त्याचे सारे श्रेय गायक..गुरू..आणि संगीत अभ्यासक अपर्णा संत यांना मनापासून द्यायला हवे.. यासाठी डॉ. अरुणा ढेरे मुद्दाम उपस्थित होत्या..आणि सुजाण रसिक सभागृहात दाद देत होता. अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना रसिक तिकीट काढून गर्दी करतात ही आगळी गोष्ट आहे..
- सुभाष इनामदार, पुणे

Tuesday, May 7, 2024

शब्द सुरांचा हा हिंदोळा...तू अन् मी..

शब्द शब्द जणू साद मनीची सूर चेतवीती याद मनीची गाणी अशी ती लळा जिव्हाळा शब्द सुरांचा हा हिंदोळा... असा शब्द सुरांचा हिंदोळा रविवारी ५ मे २४ रोजी संध्याकाळी पुण्यात रसिकांनी अनुभवला.. काही स्वरचित रचना यात सहज सुंदर भाव घेऊन प्रकटल्या..तर काही नवीन कवींच्या..काही तुमच्या आमच्या आवडीच्या..तर उत्तम गजलचे नमुने ..असा सारा स्वर हिंदोळा उत्तमरित्या मनाला आनंद देत सादर झाला.. कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या संगीत क्षेत्रात तीस वर्षाहून अधिक काळ आपल्या कलेतून रसिकांना आणि नवीन कलावंताना प्रोत्साहन देणाऱ्या जोडीने ...तू अन् मी..या नावाने नवा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कुमार आणि श्रुती यांच्या संसाराला पंचवीस वर्षे.. कुमारजी यांची पन्नाशी आणि संगीत क्षेत्रातील तीस वर्षे असा हा एकूण प्रवास सुरू आहे..तेही उभयतांच्या जोडीने..एकमेकांच्या साक्षीने.. कुमार करंदीकर यांनी संवादिनी संगतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.. अनेक नामवंत गायकांच्या मैफलीला साथ केली.. त्यांना गजानन वाटवे यांचे मार्गदर्शन लाभले नंतर.. काही रचना संगीतबद्ध केल्या.. आणि ते शशिकला शिरगोपिकर यांचेकडे गजल शिकण्यासाठी वळले..आणि त्यात गजल समजून त्या पेटीवर साथ करीत गायला सुरुवात केली..त्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले..आणि गायक..साथीदार.. संगीतकार म्हणून नाव कमावले.. तसेच श्रुती करंदीकर..यांनी रीतसर गायनाचे शिक्षण घेतले..गजानन वाटवे यांचेकडे सुगम गायनाचे धडे घेतले.. आणि मराठी - हिदी.. गाण्यांची मैफल सुरू केली..कुमार प्रमाणे गजल कडे त्याही वळल्या ..स्वतः गाण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली..आणि दोघे मिळून असा नवा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.. उत्तम शब्दांची जाण..कवितेची निवड..आणि संगीत देण्याची तयारी..यातून हिंदोळा प्रस्तुत.. तू अन् मी.. असा नवा कार्यक्रम सादर करण्याची संधी घेऊन रसिकांना आपल्या अभ्यासपूर्ण गाण्यातून बांधून ठेवण्याची हातोटी साधली.
कार्यक्रमात नेहमीची गाणी न घेता नव्या रचना ..घेऊन त्यातील शब्दांना कानात साठविण्याची संधी त्यानी यानिमित्त घेतली.. नवीन चाली आणि नव्या रचना इथे ऐकायला मिळणार याची खात्री असूनही रसिकांनी या गाण्यांना .. चालींना तशीच दाद दिली..हे कौतुकास्पद आहे. तू सप्त सूर माझे.. कुमार..मग तुझ्याचसाठी कितीदा..हे श्रुती यांचे गाणे ऐकत आनंद घेत दाद देत..स्नेहल दामले यांच्या सहज आणि उत्स्फूर्त निवेदनाने गाणी ऐकत रसिक तृप्त होत होते.. धुंद तू धुंद मी, तू येता या फुलांना अशी दोघानी स्वरांनी नटविलेली गाणी त्यातले भाव अधिक उठावदार करत होती.. मधूनच. आपल्या चुका कबूल करत जाहल्या काही चुकाचे दर्शन श्रुती देत होत्या.. कधी कुठे भेटणार..मग फांद्यावरी बांधिले मुलींनी हिंदोळे. श्रुती..आणि मोहूनिया तुजसंगे..असे कुमार म्हणत गजाजन वाटवे यांच्या स्मृतीला उजाळा दिला गेला.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा.. इलाही जमादार यांची गजल मधूनच वास्तवाची भान देणारी ठळकपणे अधोरेखित होते..ती कुमार करंदीकर यांच्या उत्तम सादरीकरणातून. सांजवेळी सोबतीला घेऊन श्रुती करंदीकर.. कुमार यांच्या अधिक जवळी गेल्या.. तर संजीवनी बोकील यांच्या ढळे वाऱ्याचा पदर..सारखे मालकंस रागात बांधलेले गाणे मनात खोलवर परिणाम करून जाते.. मराठी गजलकडे वळताना गडे सोडून दे रुसवा..ही दीपक करंदीकर यांची नवी रचना कुमार तेव्हढ्याच आत्मीयतेने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवितात.. मग सुरू होतो..शशिकला शिरगोपीकर यांची तयार करून घेतलेल्या उर्दू गजलांची .. बात निकलेगी तो.. तुमको देखा तो.. तुमको हम दिलमे.. दीलमे एक लहरसी.. तुम अपना रंजो गम.. सारख्या गजल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात..त्या कुमार आणि श्रुती दोघानी ताकदीने सादर केल्या. त्याला शशिकला शिगोपिकर यांनी उपस्थित राहून दादही दिली. ये दिल तुम बिन..हे दोघानी ताकदीने सादर केलेली रचना.. आणि गो जरासी बातपर..ही गजल अर्थासह पेश करून कुमार करंदीकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गाण्याचा आनंद दिला. अखेर रंजिश ही सही..ही रचना कुमार..श्रुती यांनी रसिकांच्या मनात साठवून ठेवताना ..ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है..हेच दाखवून दिले.. नवीन रचना आणि त्यात जुन्यांची आठवण करत..हा शब्द सुरांचा प्रवास पुढेही नवीन मालिकेत सुरू ठवण्याचे आश्वासन देऊन.. तू अन् मी.. चा पहिला एपिसोड इथेच संपवितात..
यासाठी अरुण गवई..केदार तळणीकर..आणि मिहिर भडकमकर यांची स्वर तालाची संगत शब्दांना अधिकाधिक परीपूर्ण करत होती.. आणि स्नेहल दामले यांचे ओघवते शब्द मनाला अधिक भिडत होते..कधी कधी कमीत कमी शब्दातून गहरा असर व्यक्त करत होता..
असे प्रयोग रसिकांना नक्कीच भावतात..पण त्यासाठी त्यांची अधिकाधिक उपस्थितीची गरज आहे.. तरच हे नव्या रचना सादर करायला कलावंताना प्रोत्साहन मिळेल. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com subhashinamdar@gmail.com

Monday, April 1, 2024

व्हायोलीन वादनाचे अप्रतिम सादरीकरण..

गजाननबुवा जोशी यांच्या व्हायोलीन परंपरेचा उत्तम आविष्कार चारुशीला गोसावी यांच्या वादनातून साकारला... डॉ. विकास कशाळकर गजाननबुवा जोशी यांच्याकडे चाळीस वर्षांपूर्वी ज्या श्री रागाने सुरवात केली त्या रागाचे अप्रतिम सादरीकरण करून चारुशीला गोसावी यांनी आपल्याला पुनः प्रत्ययचा आनंद दिल्याची भावना ज्येष्ठ गायन गुरू आणि अभ्यासक डॉ. विकास कशाळकर यांनी एस एम जोशी सभागृहात व्यक्त केली. संगीत साधनेची चाळीस वर्षे या निमित्ताने पुण्याच्या व्हायोलीन वादक चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय आणि सुगम व्हायोलीन वादनाची मैफल व्हायोलीन गाते तेंव्हा..या नावाने रविवारी ३१ मार्च २४ ला रसिकांसमोर सादर केली. यावेळी चारुशीला गोसावी यांनी श्री रागाने शास्त्रीय व्हायोलीन वादन करून त्यामुळे भारावून जाऊन डॉ. विकास कशाळकर यांनी त्यांच्या वादनात दाखविलेले स्वरांचे दर्जे आणि लयीचे प्रभुत्व त्यांच्या वादनात होते याबद्दल आपल्या बोलण्यात कशाळकर यांनी चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची दाद देऊन..आजकाल कलाकार गॅलरी साठी वाजवितात .पण गोसावी यांनी केलेले वादन स्वतः साठी होते म्हणून ते अधिक दर्जेदार होते याची कबुली दिली. आणि गजाननबुवांची परंपरा तुम्ही नक्की पुढे न्या ..असे सुचविले. तबला वादक मोहन पारसनीस यांनी कलाकार काय वाजवितो याचे भान ठेऊन चारुशीला गोसावी यांना केलेली साथ मोलाची होती..याबद्दल ज्येष्ठ तबला गुरू पांडुरंग मुखडे यांनी कौतुक केले आणि चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय व्हायोलीन वादनात उत्तम तारेवरची कसरत उत्तम स्वर तालात साधली याबद्दल खास शब्दात त्यांनी मनोगतात त्यांची स्तुती केली. स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी चारुशीला यांच्या वक्तशीर आणि अभ्यासू वृत्तीचा उल्लेख करून प्रामाणिक, मेहनत घेऊन कार्यक्रम सादर करते याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. पुण्यात अनेक कार्यक्रम सादर होत असताना या व्हायोलीन कार्यक्रमासाठी सभागृह पुरेपूर आनंद घेत रसिकांच्या उपस्थितीने भरलेले होते..
आरंभी शास्त्रीय व्हायोलीन वादनात श्री आणि त्यानंतर किरवाणी रागातली धून सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळविली.. त्यांना तबला साथ तेव्हढ्याच आत्मीयतेने आणि तयारीने मोहन पारसनीस यांनी केली होती. सुगम संगीतात स्वतःची ओळख व्हायोलीन वाद्यावर करून चारुशीला गोसावी प्रभात समयो पातला, जगी आंधळी मी तुला पाहते, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तर लळा जिव्हाळा सारखे भावपूर्ण अवघड गीत, कारे धरिला सारखी बैठकीची लावणी, नकोस नौके परत फिरू हे गीतरामायणातले आगळे गाणे, पराधीन आहे जगती सारखे अर्थपूर्ण गीत. तर तुझे गीत गाण्यासारखे भावगीत....आणि चारुशीला गोसावी यांची शिष्या वैष्णवी काळे यांनी आईये मेहेरबान..सादर करून रसिकांची पसंती मिळविली.
मग मधुबन मे राधिका सारखे नृत्य..ताल.. लय याला महत्व असणारे लोकप्रिय हिंदी गाणे, पाकिझा मधील ईन्ही लोगोने.. आणि शेवटी हे सुरांनो चंद्र व्हा...ह्या भावपूर्ण गाण्याने आजच्या व्हायोलीन गाते तेंव्हा..या कार्यक्रमाची सांगता झाली.. संपूर्ण कार्यक्रम म्हणजे उत्तम व्हायोलीन वादनाची अवीट मैफल अशी काही रंगत गेली त्याला यथोचित अशा निवेदिका विनया देसाई यांच्या उत्तम शब्दाने.. साथ संगत विनीत तिकोनकर, उद्धव कुंभार आणि आदिती गराडे त्यांच्या कमालीच्या हुशारीने वाजविलेल्या वाद्यातून लाभली.. पंडित भालचंद्र देव यांच्या पत्नी निलाक्षी देव यांच्या हस्ते कलावंताना स्नेह प्रतिक देण्यात आले.. तर रसिकांच्या वतीने आनंद आणि कल्याणी सराफ यांनी गोसावी यांना गुलाबाची परडी देऊन सन्मान केला. रवी मेघावत यांच्या उत्तम ध्वनीव्यवस्थापनामुळे गाणी ऐकण्याचे उत्तम समाधान रसिकांना घेता आले. तीन तास व्हायोलीनची संगत लाभलेल्या रसिकांना चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची शास्त्रीय आणि सुगम मैफल अनुभवता आली.
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Friday, March 29, 2024

संगीत साधनेची चाळिशी..!

व्हायोलीन वादिका सौ. चारुशीला गोसावी यांनी आपल्या संगीत साधनेला चाळीस वर्षे पुरी केल्याच्या निमित्ताने पुण्यात ३१ मार्च २४ रोजी एस एम जोशी सभागृहात शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या व्हायोलीन मैफलीचे..व्हायोलीन गाते तेंव्हा.. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता खास रसिकांसाठी विनामूल्य आयोजित केला आहे.. त्यानिमित्त त्यानी आपल्या संगीत साधनेकडे असे मागे वळून पाहिले आहे.. वडील कै. पं. भालचंद्र देव यांचेकडे ९ व्या वर्षापासून व्हायोलीन वादन शिकण्यास मी सर्वात केली. पुढे बी. कॉम.आणि नंतर संगीतात एम.ए. चा अभ्यास सांभळून तसेच ३५ वर्षे दूरसंचार खात्यात bsnl मध्ये नोकरी आणि घर सांभाळून हा व्हायोलीन साधनेचा वसा तितक्याच नेटाने आणि धेय्याने कायम सुरू ठेवला. १९८४ मध्ये स्वरानंद या संस्थेच्या मंतरलेल्या चैत्रबनात या कार्यक्रमात वडिलांच्या बरोबर व्हायोलीनची साथ करण्यासाठी तिथे जाऊ लागले आणि तीच माझ्या रंगमंचीय कार्यक्रमाची सुरवात होती. पुढे स्वरानंद संस्थेच्या आधी बीज एकले, रिमझिम स्वरांची, पुलकित गीते, नमन मृत्यंजयवीरा,..असे अनेक कार्यक्रमात मी साथ केली. यामुळे माझ्या साथीचे अनेक मान्यवरांकडून कौतुकही झाले. झलक..या संस्थेचे अनेक कार्यक्रमही पुढे वाजविले. इतर अनेक लहान मोठ्या कार्यक्रमात व्हायोलीनची साथ करण्याची संधी मला प्राप्त झाली.. हळूहळू माझी साधना सुरू राहिली..केवळ सुगम नाही तर..नाट्य संगीत आणि संगीत नाटके यांनाही व्यासपीठावर साथ करण्याची संधी मला लाभली. शास्त्रीय वादनाचे वडिलांबरोबर आणि स्वतंत्र असे जवळजवळ १५०० कार्यक्रम सादर झाले असतील. सूरसिंगार, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, गांधर्व महाविद्याय, खाँ साहेब अल्लादिय्या खाँ स्मृती समारोह, बांद्रा संगीत सभा, महाराष्ट्र मंडळ.. चेन्नई, गानवर्धन...पुणे, स्त्री वाद्य वादन महोत्सव, कुंदगोळ येथील सवाई गंधर्व महोत्सव अशा मानाच्या आणि प्रतिष्ठित ठिकाणी शास्त्रीय व्हायोलीन वादनाची संधी प्राप्त झाली. सुप्रसिद्ध क्लारोनेट वादक बंडोपंत सोलापूरकर यांच्या बरोबर सहवादनाचे कार्यक्रम केले. दूरदर्शवरील एम २, जी २ तसेच साम वाहिनीच्या मधुरा कार्यक्रमात मुलाखती दरम्यान रसिकांना मंत्रमुग्ध करता आले. याशिवाय bsnl मधील नोकरीत अखिल भारतीय स्तरावरील शास्त्रीय स्तरावरील स्पर्धेत सतत २२ वर्षे सुवर्णपदकाची कमाई करू शकले.
या माझ्या चालूच वर्षांच्या संगीत साधनेत कुंदगोळ येथील सवाई गंधर्व महोत्सवात वादन करायला मिळाले हा माझा पहिला पुरस्कार..त्यानंतर स्वामी हरिदास संगीत महोत्सवात सूर सिंगार सन्मान, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा संगीत सेवा पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक संघाचा लता मंगेशकर पुरस्कार हे ही मला मोलाचे वाटतात. माझ्या या संगीत साधनेत माझ्या घरातील लोकांचा उत्तम पाठींबा..आणि त्यांचे कौतुक ..मदत मोलाची वाटते.. त्यातही माझे पती राजय गोसावी यांची साथ फारच महत्वाची आहे. सर्वात मोठी कौतुकाची थाप मायबाप रसिकांची लाभली..त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मी ..अभय आगाशे, नीलिमा राडकर आणि संजय चांदेकर सादर करीत असलेल्या रसिकप्रिया व्हिओलीना या कार्यक्रमात सहभागी होण्याची १५ वर्षे संधी मिळाली आहे.. अभिजित पांचभाई, आनंद माडगूळकर, यांच्या बरोबर गीतरामायणाचे कार्यक्रम भरपूर वाजविले. तसेच लोकबिरादरी प्रकल्प, सियाचीनमधील ऑक्सिजन प्रकल्पासाठी कार्यक्रम करून निधी उभारण्याचा प्रयत्न केला. अशा कार्यक्रमात आनंद देशमुख, विनया देसाई आणि नीरजा आपटे यांचे निवेदनाद्वारे सहकार्य मला मिळत गेले आहे. गेली काही वर्षे मी चित्रकला छंद जोपासत आहे..त्यासाठी मला सुबोध कार्लेकर मला मार्गदर्शक लाभले आहेत. माझे आई..वडील, संगीत क्षेत्रातील वडीलधारी मंडळी आणि रसिकांच्या आशीर्वादाने ही वाटचाल अशीच सुरू रहावी हीच इच्छा आहे..
आपली, सौ.चारुशीला गोसावी, पुणे

Sunday, January 28, 2024

राजदत्त तथा दत्तात्रय अंबादास मायाळू याना पद्मभूषण

राजा परांजपे यांचेकडून धडे गिरवून ज्यांनी आपल्या उत्तम चित्रपटांनी समाज मनावर उत्तम संस्काराचे बीज रोवले त्या कलावांतच्या उतरत्या वयात या मराठी व्यक्तीचा असा सन्मान केला याचा आम्हा सर्व रसिक..वाचकांना अभिमान वाटतो.. स्वतःचा आगळा ठसा ठेवणारा हा मोठा धेय्यावेडा , तपस्वी माणूस..आपल्या वागण्यातून बोलण्यातून मराठी रसिकांवर छाप पाडत गेला.. त्यांचे चित्रपट आदर्श झाले आणि त्यातून नवे कलावंत..चित्रपट सृष्टीला लाभले.. तंत्राच्या आहारी न जाता अधिकाधिक उत्तम रित्या कथा ताकदीने पोचविण्याचा त्यानी सचोटीने प्रयत्न केला.. अनेक राष्ट्रीय पारितोषिके त्यांच्या चित्रपटांना लाभली..आता पद्मभूषण मिळून त्यांच्या या कारकिर्दीला नवे वलय लाभले आहे.. त्यांना उत्तम आरोग्यपूर्ण आयुष्य यापुढेही लाभावे आणि त्यानी आपले उत्तम शिष्य निर्माण करावेत..हीच आम्हा रसिकांची इच्छा..! राजदत याना आम मानाचा मुजरा..! जय हिंद..जय महाराष्ट्र...! - subhash inamdar, Pune subhashinamdar@gmail.com
राजदत्त जीवन परिचय मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू, चित्रपटासाठीचे नाव राजदत्त. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील 'राज 'आणि स्वतःच्या नावातील 'दत्ता' घेऊन राजदत्त झाले . अमरावती जिल्ह्यातील धामणंगाव इथे त्यांचा जन्म झाला. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात २ महिने १८ दिवस कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणा पासून गणेश उत्सव,मेळा,शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे ',आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार ','साष्टांग नमस्कार'मधील भूमिका चांगल्या झाल्या. विशेषतः 'साष्टांग नमस्कर' मधली कवीची भूमिका खूप छान जमली होती. शिवाय बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मध्येही काम केले . सदुभाऊ डांगे नावाचे केरळमधले संघाचे प्रचारक होते. ते नाटिका लिहीत. त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्तांनी भूमिका केल्या. प्रत्यक्ष राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळाले. महाविद्यालयात असतांना दर रविवारी सेवाग्राम जवळच्या गोपुरीतील कृष्ठधाम केंद्रात शुश्रूषा पथकांत सहभागी होत. समाजसेवेची आस आजही त्यांच्या कलाकृतीतून दिसते. सुप्रसिद्ध लेखक ग.त्र्य माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने दैनिक तरुण भारत नागपूर येथील 'युनिव्हर्सिटी 'सदरात लिखाण सुरू केले.त्यांच्यातील पत्रकारितेचा हा श्रीगणेशा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दैनिक भारत या वृत्तपत्रात नोकरी केली.त्यानंतर मद्रास इथल्या चांदोबा या मुलांच्या मासिकांत संपादकीय विभागात दोन वर्ष काम केले. त्यांची मुलगी भक्ती मायाळू प्रसिद्ध मालिका संकलक आहेत.
चित्रपट कारकीर्द मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असतांना त्यांच्या ओळखींमुळे इथल्या AVMच्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी त्यांचे नाते जोडले गेले. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे AVMच्या 'बाप बेटे' चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ १३ चित्रपटांसाठी राजाभाऊंचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यात प्रामुख्याने 'देवघर','जगाच्या पाठीवर','आधी कळस मग पाया ','हा माझा मार्ग एकाला','पाठलाग','पडछाया' इ. चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट 'मधुचंद्र' आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला; हिंदीत संगीतकार असलेले एन.दत्ता यांना मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायला लावले. पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही. अशावेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला - 'घरची राणी'. राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही.१९६९ साली 'अपराध'चित्रपटाला पुन्हा एकदा 'राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार'मिळाला. त्यानंतर सतत २८ चित्रपटाचे दिग्दर्शन केले [२]त्यापैकी ९ चित्रपटांना प्रथम, ३ चित्रपटांना द्वितीय, २ चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण १४ पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले 'राजदत्त' हे एकमेव दिग्दर्शक आहेत.
राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे. त्यांच्या 'शापित','पुढचं पाऊल' आणि 'सर्जा' या तीन चित्रपटांना 'रजतकमळ'मिळालंय . चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला. राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचले. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा 'देवकी नंदन गोपाला' हा चित्रपट महाराष्ट्रबरोबर कर्नाटक, तामिळनाडू मध्येही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही प्रदर्शित झाला.ताश्कंद फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला.'शापित' चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी 'इरिया' हा हिंदी चित्रपटही केला. त्यात शर्मिला टागोर, मार्क जुबेर यांच्या भूमिका होत्या .

Wednesday, January 17, 2024

ओ.पी.नय्यर..आठवणी आणि गाणी

ओंकार प्रसाद नय्यर..अर्थात ओ.पी. नय्यर.. यांच्या गाण्यांनी आणि आठवणीने भारलेली मंगळवार संध्याकाळ..!
आपल्या मेलोडियस आणि उडत्या चाली..यातून हिंदी चित्रपटसृष्टीतील या महान संगीतकाराची अनेक गाणी आजही मनावर. आणि ओठावर आहेत.. त्यातलीच काही निवडक गाणी पुण्यात व्हायोलीन मधून अभय आगाशे यांनी तन्मयतेने सादर केली आणि त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाना अधिक हळुवार बनवून शब्दातून तसेच चित्रातून रसिकांच्या मनात ओ.पी. नय्यर यांचा स्वभाव, त्यांची शिस्त त्यांची शैली आणि त्यांच्या आठवणी प्रकाशचित्रकार आणि उत्तम लेखक तसेच या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची होती त्या सतीश पाकणीकर यांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमातून ओ.पी. प्रेमी रसिकांच्या मनात रुजविण्याचे उत्तम कार्य करून नवीन पिढीला या संगीतकाराची ओळख करून दिली. चित्रपट संगीताच्या अभ्यासिका सुलभा तेरणीकर सतीश पाकणीकर यांच्याविषयी माहिती देत त्यांचे नय्यरप्रेम किती आहे याविषयी बोलून त्यांना शुभेच्छा दिल्या.
ओपिंचे संगीत म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा हॅपिनेस इंडेक्स..असा उल्लेख करून सतीश पाकणीकर सांगतात.. बसल्या जागी तुम्हाला उड्या मारायला लावेल असे ते संगीत आहे..मेलोडीयस आणि रिदमकिंग असलेले ओ.पी. हे त्यांना त्यांच्या बरोबर काम केलेले संतूरवादक शिवकुमार शर्मा त्यांचे वर्णन करीत. ओ.पी. नय्यर यांच्या कॉफी टेबल पुस्तकाच्या निमित्ताने सतीश पाकणीकर यांना त्यांचा सहवास लाभला त्यातून ते व्यक्ती म्हणून आणि संगीतकार म्हणून कसे आहेत हे जवळून अनुभवण्याची संधी मिळाली..नय्यर यांच्या जन्मदिवसाच्या निमीत्त विवेक पाध्ये यांच्या सहकार्यातून कार्यक्रम करताना त्या साऱ्या आठवणी त्यानी रसिकांच्या हृदयात कोरल्या. इथे आठवणी आणि गाणी असा अनुभव टिपण्या सारखा होता..म्हणूनच याची दखल घेणे अत्यावश्यक होते .
संगीतकार..एक व्यक्ती म्हणून आणि कलकार म्हणून इतर वादकांना आणि गायकांना कसा मान देतो त्याची उदाहरणे इथे अधिक बोलकी झाली.. पाकणीकर बोलत होते..आठवणी विस्तृत सांगत होते.. गाणी अभय आगाशे आपल्या व्हायोलीनमधून सादर करून शब्द शब्द ..मनात .. स्वरातून बोलते करत होते.. अतुलकुमार उपाध्ये यांचेकडे व्हायोलीनची तालीम घेतलेल्या अभय आगाशे यांनी आपल्या वादनाने गाण्याना अधिक नेटकेपणाने शब्द नसताना बोलके केले.. त्यांना अनुजा आगाशे, प्रसाद जोशी, दिलीप व्यास आणि रोहित साने या सहवादकांच्या उत्तम साथीने गाणे एकाग्रतेने खुलवत होते.. प्रत्येक गाण्याचे सादरीकरण पुनःप्रत्ययाचा आनंद देत होता.. गाणी सादर होताना पडद्यावर ओ.पी. ..चित्रपट, त्यातील कलाकार, आणि गाण्यात वादन केलेले कलावंत खास करून सतीश पाकणीकर यांनी दाखवून त्याचे महत्व अधिक ठळक केले.
आइये मेहरबाँ, बाबूजी धीरे चलना, आखों ही आखोमें इशारा हो गया... आवो हुजुर तुमको,छोटासा बालमा, सून सून सून जालिमा, इशोरो इशारोमे.. तुमसा नहीं देखा. पासून दिवाना हुआ बादल पर्यंत सोळा गाण्यांचा नजराणा इथे पेश झाला.. व्हायोलीन या वाद्याची उत्तम पकड ..गाण्यातील नेमकेपणा आणि त्यातले बारकावे अभय आगाशे यांच्या सादरीकरणात स्पष्ट दिसले.. रेकॉर्डिंग साठी आलेल्या वादकांना लगेच पेमेंट करणारे..वेळ पाळणारे..त्यातही देलेला शब्द पाळणारे..पण आयुष्याच्या उत्तरार्धात अधिक खडतर आयुष्य भोगणारे..तरीही आपला आब आणि रुबाब सांभाळत , हिंदी न येताही उर्दू भाषेतून का करणारे उत्तम काव्याची जाण असणारे तसेच कधीही कुणापुढे न झुकणारे ..आपल्या मस्तीत हिंदी चित्रपटसृष्टीत राज्य करणारे महान संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे उदाहरण आदर्श म्हणून कसे होते..ते या आठवणीतून आणि व्हायोलीन मधून सादर झालेल्या अनुभवातून सिध्द झाले. कार्यक्रमाचे निमंत्रक होते..राजलक्ष्मी कलादर्पण हॉल , कोथरूडचे विवेक पाध्ये आणि राजीव डिंगणकर..!
कार्यक्रमासाठी हेमंत पाकणीकर आणि रवी केळकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. केवळ ओ.पी. प्रेमींना नव्हे तर हिंदी संगीताचे जाणकार असणाऱ्या रसिकांना असे कार्यक्रम हे आनंद आणि समाधान देतात.. अतिशय अभ्यासपूर्ण असलेल्या या कार्यक्रमाचे पुन्हा विविध गावात सादरीकरण व्हायला हवे आहे. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com